मला खात्री आहे कि मागील लेखामध्ये लिहिल्या प्रमाणे तुम्ही चार ही प्रश्नांची उत्तरे लिहून ठेवली असतीलच. कदाचित हे सर्व विचार कागदावर मांडताना थोडं जड झालं असेल कारण आपण अश्या पद्धतीने खूप कमी वेळा विचार करतो. पण जर आर्थिक नियोजन व्यवस्थित करायचे असेल तर या सर्व बाबींच खोलवर विचार हा करायलाच हवा.

चला तर मित्रहो, आपण प्रश्न क्र. १ चे विश्लेषण करून पाहूया. प्रश्न क्र. १ असा आहे कि, “आज पासून तुमच्या आयुष्यात शेवट पर्यंत ( म्हणजे साधारण वय वर्ष ७५/८० पर्यंत ) अश्या कोणत्या घटना आहेत ज्या घटना झाल्याच पाहिजेत व त्यामुळे मी आनंदी होईन”. ह्या मध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्या सर्व घटना वेळेत झाल्या पाहिजेत. याचा नेमका अर्थ काय हे आपण घनाचे उदाहरण घेऊन बघूया.

आपण जो घना आहे ना त्याचे वय ३० असून राधाचे वय २८ आहे. घनाला २ गोंडस बाळे आहेत. मोठा मुलगा राजूचे वय ६ वर्ष व लहान मुलगी पिंकीचे वय ४ आहे. असे हे घनाचे कुटुंब, ज्यांच्या सोबत घनाचे आई वडील आनंदाने राहत असतात. या कुटुंबाला त्यांचे आनंदी आयुष्य जगण्यासाठी दर महा ३५०००/- रुपये लागतात. आई वडिलांची जबाबदारी व इतर कौटुंबिक खर्च घना हा खूप चांगल्या प्रकारे सांभाळत आहे. पण हे रोजच्या जीवनाबद्दल झाले. एवढे चांगले जीवन जगत असताना सुद्धा घनाला एक अनामिक भीती सतावते आहे. नेहमी त्याला काही तरी चुकल्यासारखे वाटते. याचं नेमके कारण म्हणजे रोजच्या जीवनाचे खर्चाचे ठिक आहे, पण भविष्याबद्दल काय? हा प्रश्न त्याला सतावत आहे. त्याच्या भविष्यातील गरजां विषयी काय काय प्रश्न त्याच्या मनात असतील ते जरा पाहूया

घना सोबत तुमच्या व इतर अनेक लोकांच्या मनात खालील प्रश्न असतात.

  1. राजू व पिंकी या दोघांच्या शिक्षणासाठी नेमके किती व कधी पैसे लागतील.
  2. भारतीय संस्कृती प्रमाणे मुलांचे लग्न ही पालकांची जबाबदारी असते व त्यासाठी किती पैसे लागतील.
  3. घना आज खाजगी कंपनी मध्ये नोकरी करत आहे. त्यामुळे त्याला निवृत्ती नंतर कोणतेही प्रकारचे पेन्शन मिळणार नाही. त्याला त्याची सोय स्वतः च करायची आहे.

अशीच काही प्रमाणात माझ्या प्रत्येक शेतकरी बांधव व इतर व्यावसायिक मित्रांची परिस्थिती आहे. प्रथम दर्शनी ही एकदम अवघड वाटणारी गोष्ट एकदम सोप्पी आहे. ते कसं ते पाहूया. घना सोबत प्रत्येक वाचकाने, त्याच्या आयुष्यात अश्या सर्व घटना लिहून काढून त्याची रूपरेषा खालील प्रमाणे लिहून ठेवली पाहिजे. त्याला मी Financial time line म्हणतो. ती रूपरेषा खालील प्रमाणे असेल.

 

वय ३०———————————-४२————४४————————————-६०—————८०

घनाचे आजचे वय ३०    राजूचे शिक्षण    पिंकीचे शिक्षण  घनाची निवृत्ती वय वर्ष

राधाचे आजचे वय २८

राजूचे आजचे वय ०६

पिंकीचे आजचे वय ०४

आपल्या शिक्षण पद्धती प्रमाणे राजू व पिंकी किंवा प्रत्येक मुल जर व्यवस्थित उत्तीर्ण होत गेले तर त्यांच्या वयाच्या १८ व्या वर्षी इयत्ता १२ वी संपेल व त्यानंतर उच्च शिक्षणासाठी पैसे लागतील. तसेच वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्ती झाल्यावर पुढील २० वर्षाची तरतूद घनाला करावी लागेल. इथे प्रत्येक गोष्टीसाठी लागणारी तरतूद या लेखमध्ये सांगणे खूपच कठीण आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि – निवृत्तीचे २० वर्ष एक छान आयुष्य जगण्यासाठी जी काही तरतूद करायची आहे त्यासाठी घनाकडे फक्त ३० वर्ष शिल्लक आहेत.

पण नेमकी निवृत्तीची पुंजी किती असावी हे जो पर्यंत घनाला / तुम्हाला कळत नाही तो पर्यंत त्याबाबतीतचे गांभीर्य घनाला कधीच येणार नाही. जसं मागील अनेक लेखांमध्ये मी सांगत आलो आहे कि, “ जो पर्यंत कोठे जायचे आहे हे ठरत नाही तो पर्यंत कसं जायचे याचा मार्ग सापडणार नाही” आता Retirement म्हणजे निवृत्ती म्हणजे काय हे जरा जाणून घेऊया. माझ्या म्हणण्याप्रमाणे निवृत्ती म्हणजे असा काळ ज्या वेळे पासून तुम्ही पैश्यासाठी काम करणे बंद करता. हा काळ कधीही असू शकतो. पण साधारण पणे या वेळी तुमच्याकडून खालील नियम पाळले गेले पाहिजेत.

  1. वरील नमुद प्रत्येक जबाबदारी मधून तुम्ही मुक्त झालेला आहात.
  2. तुम्हाला बाजारात कोणालाही पैसे देणे नाही.
  3. कोणाकडून पैसे येणे नाही.

म्हणजे तुम्ही पूर्ण कर्ज मुक्त आहात आणि यावेळी तुम्हाला तुमच्या आवडीचे छान आयुष्य जगण्यासाठी, “काम करावे लागणार नाही”. म्हणजे काय; तर या वेळी तुमच्या कडे तुमच्या निवृत्तीसाठी लागणारी पुंजी तुमच्याकडे तयार आहे.

आता तरी हे सगळ महाभयंकर वाटत असेल. पण सर्वांना अगदी मनापासून सांगू इच्छितो कि जर या गोष्टीवर गांभीर्याने विचार केला नाही तर आयुष्यभर मनात हूर हूर घेऊन जगावे लागेल आणि ती गोष्ट तुमच्या तब्येतीसाठी अत्यंत घातक आहे एवढ मात्र नक्की.

आर्थिक नियोजनाचे आकडेवारी डोक्यात ठेऊन त्याचे प्रत्येक पैलू इथं मांडणे खूप अवघड आहे. जरी आकडेवारी मांडली तरी ती प्रत्येकासाठी वेगळीच असेल. कारण तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या वातावरणात, वेगळ्या परीस्थितीत वाढलेला आहात. प्रत्येकाच्या गरजा, आशा, आकांक्षा, अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात. तेव्हा ज्यावेळी तुमच्या बरोबर भेटीचा योग येईल त्यावेळी यावर आपण सविस्तर बोलूच तो पर्यंत नमस्कार…