fbpx

आर्थिक यशाचा आराखडा – 3

//आर्थिक यशाचा आराखडा – 3

आर्थिक यशाचा आराखडा – 3

आतापर्यंत आपल्या एवढ लक्षात आले आहे कि जर आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचे असेल तर प्रथम भरपूर पैसे आले पाहिजेत. आणि जर पैशाचा ओघ चांगला हवा असेल तर तुमची पैश्याबाबतची विचार पद्धती व्यवस्थित पाहिजे. ही चांगली अथवा वाईट विचार पद्धती कशी बनते या वर आपण इतके दिवस पहायचा प्रयत्न करत आहोत. म्हणजेच काय कि, “तुमचा आर्थिक यशाचा आराखडा” कसा आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहातच.

मागील लेखामध्ये शब्दाच्या अस्त्रामुळे तुमची Money blueprint कशी होते हे पाहीले. याच बरोबर तुम्ही काय पाहता, तुम्हाला काय अनुभव येतात यावर तुमची Money blueprint बनत असते. आयुष्यात प्रत्येक घटना ही तुमच्या मनावर आर्थिक बाबींबाबत काही विचार पक्के करत असते. मग आपण त्याच पद्धतीने वागत असतो.

चला आज, आत्ता, ताबडतोब एक प्रयोग करू. प्रत्येक वाचकाला मी विनंती करतो कि तुम्ही तुमच्या बालपणा मध्ये जा. आता थोडा विचार करा कि, “तुम्ही मोठे होत असताना तुमचे  आई – वडील पैश्याबाबत कसा विचार करत होते.” त्यांची पैश्यासंबंधी आचरण कसं होते. त्यांनी त्यांचा पैसा योग्य प्रमाणे वापरला होता का? त्यांची गुंतवणूकीची पद्धत कशी होती. ते एक चांगले गुंतवणूक दार होते कि अजिबातच गुंतवणूक करत नव्हते. जर गुंतवणूक करण्यात चांगले असतील तर त्यांची गुंतवणूक कश्यामध्ये होती? जमीन, घर, दुकान या प्रकारामध्ये गुंतवणूक केली होती कि त्यांची बँकेमध्ये Fix Deposit होती. अश्या अनेक प्रकारच्या विचारांवर थोडे बारकाईने लक्ष दया. कारण जे काही तुम्ही लहानपणापासून बघत आला असाल, तसेच तुम्ही वागत आहात. कारण तुमची विचार पद्धती तशीच बनली आहे.

प्रत्येक जीवंत प्राणी (त्यात आपण पण आलोच) हा लहानपणापासून अनुकरण करण्यात एकदम पुढे असतो. आपण ज्या गोष्टींचे अनुकरण कसा करता सवय लावून घेतो तसेच आपण घडत असतो. असे नसते तर तुमच्या गावामध्ये एक व्यक्ती, जी धंद्या मध्ये एकदम तरबेज आहे, त्या व्यक्तीची पुढची पिढी ही तशीच झाली नसती.

तात्पर्य असे कि आपण इतर बाबींप्रमाणे, पैशाच्या बाबतीत पण आईवडिलांचे / पालकांचे अनुकरण करत असतो. माझे फायनान्शीयल फिटनेसचे कार्यशाळा होतात. त्यामध्ये मी माझे स्वतःचे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी मुळ कोल्हापूरचा. आम्ही लहान असल्यापासून वडिलांचा व्यवसाय होता. लेथ मशीन होते व त्यावर जॉब वर्कचे काम चालू असे. जॉबवर्कच्या कामामध्ये एकदम हाभरवंडा होता. कामगार वर्ग पण एकदम चांगला होता. पण दर ४ वर्षांनी एक मंदी लाट यायची (असे मी ऐकत आलो होतो) म्हणजे काय कि काम कमी होते. मग खर्च भागात नाहीत. मग ज्याच्याकडे scrap माल दयायचा त्याच्याकडून उधारी आणायची. पण एक गोष्ट निश्चित होती कि त्या मंदीच्या काळामध्ये पैश्याची खूपच चण – चण असायची व संपूर्ण घरामध्ये त्रासदायक वातावरण असायचे. जस जस मोठा होत गेलो, शिक्षणासाठी बाहेर पडलो. मुंबई विद्यापीठ येथून MBA पूर्ण केले. चांगली नोकरी लागली. एवढ होऊन सुद्धा मी आर्थिक दुर्बलच राहत होतो. कारण दर महिन्याला आलेला पैसा मी खर्च करून टाकत असे. आलेल्या पैश्याची गुंतवणूक करायची असते हे मी लहानपणापासून कधीच पाहीले नव्हते. मंदीच्या काळात जसे scrap वाल्याकडून उधार आणलेले पाहीले होते तसेच पगाराचे पैसे संपले कि मग पुढच्या महिन्यात देतो अश्या वायदयावर मित्रांकडून उधार घ्यायचो. आणि ह्याचा जणू एक पायंडाच पडला होता. एक दिवस या सर्व गोष्टीमुळे खुपच त्रस्त झालो होतो. एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी असताना सुद्धा पैश्याच्या बाबतीत मी दुर्लब कसा याचं नेहमी आश्चर्य वाटत होते. सन २००० पासून माझ्या स्वतंत्र व्यवसायामध्ये उतरलो. परत तेच. एवढे पैसे येऊन सुद्धा खिसा नेहमी रिकामाच.

अश्या वेळी माझ्या स्वतःच्या वागण्यावर बारकाईने पाहीले. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली कि पैसे कमावण्याच्या बाबतीत मी वडिलांचे उत्तम अनुकरण करत होतो पण पैसा न गुंतवणे, पैश्याचे नियोजन नीट न करणे या बाबतीत ही वडिलांचे १००% अनुकरण करत होतो. आता चूक कळाली होती. ती सुधारण्यासाठी प्रयत्नशील झालो. मंदीमुळे प्रभावित होणारे व्यवसाय या पासून लांब झालो व गुंतवणूक करायला सुरवात केली.

अश्याप्रकारे जुन्या विचारातून बाहेर पडलो व सतत वाढणाऱ्या उत्पन्नाचा धनी झालो. मित्रांनो तुम्ही जे काही ऐकता, बघता किंवा पैश्याबाबतीत एखादी घटना ही तुम्ही कोण आहात हे ठरवते. मी माझा अनुभव सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वाचकाने थोडे भुतकाळात जाऊन तपासणे  १००% आवश्यक आहे. कदाचित तुमच्या आर्थिक यशाचा आड येणारा कचरा तिथेच अडकला असेल. तो जर सापडला आणि तुमच्या मनातून साफ करून टाकला कि मग तुम्हीपण सतत वाढणाऱ्या उत्पनाचे धनी व्हाल.

By |2017-02-27T12:54:48+00:00February 27th, 2017|Categories: Blog|1 Comment

About the Author:

One Comment

  1. Jagdish ramrav jadhav September 18, 2017 at 3:37 pm - Reply

    farmer sathi liha

Leave A Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.