आ पण आपल्या आयुष्यात जे काही पाहतो, ऐकतो हे सर्व आपल्या मनाच्या कपाटामध्ये व्यवस्थित साठवून ठेवलेले असते. या सर्व साठवलेल्या गोष्टींमुळे प्रत्येकाची एक मानसिकता तयार झालेली असते व त्याच प्रमाणे आपण निर्णय घेतो. जसं घर बांधण्यासाठी एक आराखड्याची (बिल्डिंग ब्ल्यूप्रिन्ट) गरज असते; तसेच योग्य तेवढे पैसे कमावण्यासाठी पैशाबद्दलची मानसिकता योग्य असावी लागते. यालाच मी आर्थिक यशाचा आराखडा म्हणजे (मनी ब्ल्यूप्रिन्ट) म्हणतो. ही मनी ब्ल्यूप्रिन्ट कशी तयार होते, याकडे थोडे बारकाईने पाहूया.

त्यापूर्वी मला तुम्हाला यश आणि पैसा याबद्दल एक समीकरण सांगायचे आहे.

विचार X भावना X कृती (ॲक्‍शन) = निकाल (रिझल्ट)

हा एकमेव फॉर्म्युला तुम्हाला अपेक्षित यश व पैसा देऊ शकतो. म्हणजे काय की, विचार केल्यामुळे- मनातील भावना जागृत होतात. भावना जागृत झाल्यामुळे ॲक्‍शन घेतली जाते, आणि ॲक्‍शन घेतली तरच रिझल्ट मिळतो. जी व्यक्ती कामच करत नाही ती विचारच करत नाही. म्हणून जर कोणी चुकीचे वागले तर आपण त्याला म्हणतोच ना, जरा विचार कर की लेका.

तुमचे आर्थिक यश हे तुम्ही पैशाबद्दल कसा विचार करता, पैशाबद्दलच्या तुमच्या भावना व ते आर्थिक यश मिळवण्यासाठी तुम्ही काय व कशी कृती करता यावर अवलंबून आहे.

थोडे सोपे कारून पाहूया, माझा एखादा लेख जेव्हा प्रसिद्ध होतो तेव्हा साहजिकच खूप लोक वाचत असतील. त्यातले काहीजण फोन करतात काही सोडून देतात. तर काही लोक यापेक्षाही पुढे जाऊन माझे व्याख्यान ठेवायची तसदी घेतात. माझे एक वाचक मित्र माधव चव्हाण, गाव सुस्ते, ता. पंढरपूर यांनी माझे व्याखान आयोजित केले. हे सर्व करण्यामागे त्यांचा एकच विचार होता/ आहे की प्रत्येक शेतकरी मित्राला आर्थिक गणित समजले पाहिजे. तरच शेतकरी सुखाने जगू शकतो हे त्यांना पूर्णपणे माहीत आहे.

आता या घटनेकडे आपण बारकाईने पाहीले तर वरील दिलेले समीकरण किती बरोबर आहे हे लक्षात येते. अनेक लोकांनी लेख वाचला व सोडून दिला. पण श्री. चव्हाण यांनी लेख वाचताना विचार केला. त्यांच्या शेतकरी बांधवांप्रती चांगल्या भावना जागृत झाल्या. त्यांनी मला निमंत्रण देण्याची कृती केली. या कृतीमागची त्यांची चांगली भावना माझ्यापर्यंत पोचली. मी सुस्ते गावात व्याखानासाठी हजर झालो. तसं पाहिलं तर ही खूप छोटीशी घटना आहे. पण या व यासारख्या अनेक घटना आहेत ज्याचा तुमच्या आर्थिक यशाशी थेट संबंध आहे. श्री. चव्हाण यांच्या कृतीला मनी ब्ल्यूप्रिन्टच्या भाषेत प्रोग्रॅमिंग म्हणतात. आता नवीन समीकरण कसे होईल ते पाहूया.

प्रोग्रॅमिंग X विचार X भावना X कृती = निकाल

प्रोग्रॅमिंग हे आपण अनुभवलेल्या गोष्टीमुळे होत असते. त्यामुळे आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार, ही म्हण तंतोतंत खरी ठरते. मुळातच माझ्या बहुतांश शेतकरी मित्रांची पैशाबद्दलची विचारधारा ही त्यांच्या आर्थिक यशाला मारक असते. उदा. जवळ जवळ ८०% पेक्षा जास्त शेतकरी कर्जाच्या कचाट्यात सापडलेले असतात.

आता कोणी म्हणेल की निसर्गच साथ देत नाही, तर जगण्यासाठी कर्ज घ्यावेच लागते. त्यामुळे माझ्या शेतकरी मित्राला कर्जामधून बाहेर पडायचे असते, याचा कधी विचारच येत नाही. त्याच्या मनामध्ये जगण्याची हीच पद्धत आहे हे ठासून भरलेले असते.

जर कर्जविरहीत जीवन हे तुम्हाला माहितीच नसेल तर त्याबद्दल तुम्ही कधीच विचार करणार नाही. जर हा विचारच केला नाही, तर त्या दिशेने तुम्ही कधीच प्रयत्न करणार नाही आणि त्याचमुळे तुम्ही कधीच कर्जमुक्त होणार नाही. हा मात्र १००% निकाल होय. जर आपण कर्जमुक्त झालो नाही, तर आपली आर्थिक बाजू कधीच सुधारणे शक्‍य नाही.

प्रत्येक व्यक्तीने त्याच्या मनावर बिंबवलेल्या पैशाबद्दलच्या विचारांवर काम करणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजेच काय तर डोक्‍यातील पैशाबद्दलचे प्रोग्रॅम/ विचार तपासून त्यामध्येयोग्य ते बदल घडवले पाहिजेत. आता हे आपले मनातील पैशाबद्दलचे विचार काय आहेत आणि ते बदलायचे कसे, हा विचार तुमच्या मनात येत असेल. पण त्यापूर्वी हे जे काही विचार आपल्या मनावर कोरले गेले आहेत याची सुरवात कुठून झाली यावर थोडा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरेल. तर याबद्दल आपण पुढच्या लेखामध्ये सविस्तर पाहूया.