हल्लीच, म्हणजे १ आठवड्यापूर्वी दसरा सण होऊन गेला. मागील लेखामध्ये सांगितल्या प्रमाणे अपराजिता देवीची मनोभावे स्थापना करून आर्थिक यशासाठी आशीर्वाद मागितला असेलच. आता हे नक्की काय याचाच विचार करताय ना? थोडक्यात सांगायचे म्हणजे अ-पराजित. पराभव न होणारा. आर्थिक बाबींवर विजय मिळवणारा विचार. दसरा हा सणच मुळात नकारात्मक गोष्टींवर विजय मिळवण्याचा. म्हणून या दिवशी रावणाचा वध केला जातो. लंकापती रावण तर रामाने कधीच मारला आहे. पण शेतमालाचे पडणारा भाव व शेतकऱ्यांचे वाटोळे करणारा रावण अजून जिवंत आहे. त्याचा अंत होणे आवश्यक आहे. ज्या दिवशी बळीराजा जागृक होईल व त्या रावणाचा अंत करेल तोच दिवस हा दसरा-दिवाळी असेल.

आता हा नवीन रावण कोण आणि त्याला कसे शोधायचा ? आहो मंडळी, त्याला कुठे शोधायची गरज नाही. तो तुमच्या मानत आहे. मागील लेखामध्ये सांगितल्या प्रमाणे, पैश्याच्या प्रती नकारात्मक विचार खोडून टाकले कि आर्थिक यशाचा मार्ग मोकळा होईल. पण हे नकारात्मक विचार कोणते आणि ते कसे तयार होतात यावर जरा सविस्तर विचार करू. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात, तो जे काही ऐकतो, पाहतो आणि त्याच्या बाबतीत काय काय घटना घडतात, यावर त्याची विचारसरणी तयार होत असते. जेव्हा या वरून पैश्याचे विचार घडतात, त्यालाच मी Money Blueprint म्हणतो. या तीन महत्वांच्या बाबींमधील आज, “ऐकणे किंवा शाब्दिक माऱ्यामुळे काय होते ते पाहूया.”

आज आपण प्रत्येकजण आपल्या बालपणात जाऊया. जर हे वाचत असताना तुम्ही शालेय विध्यार्थी असाल, तर तुम्हाला आजूबाजूला पैश्याबद्दल काय काय ऐकु येतय ते जरा जवळून बघू. त्या सर्व विचारांपैकी खालील काही वाक्य :-

  1. पैसा हेच साऱ्या वाईटांचे मूळ आहे.
  2. पैसा कमवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात.
  3. प्रत्येक माणूस श्रीमंत होऊ शकत नाही.
  4. पैश्याच्या श्रीमंती पेक्षा मनाची श्रीमंती मोठी आहे.
  5. पैसा काही झाडाला लागत नाही.
  6. आपल्याला परवडणार नाही.

आता तुम्ही विचार करत असाल कि, “असे नुसते विचार करून कधी श्रीमंत अथवा गरीब कसे होईल.” पण माझ्या शेतकरी बांधवांनो, “पैश्याच्या श्रीमंती पेक्षा मनाची श्रीमंती मोठी आहेच. पण त्याला आर्थिक जोड मिळाली तर काय प्रॉब्लेम आहे का ?” पण मनाच्या श्रीमंती मधेच अडकून जातो व नेहमी म्हणत राहतो कि, “तुम्ही एकाच वेळेस श्रीमंत व धार्मिक राहूच शकत नाही.” याच मध्ये जर धार्मिक राहायचे असेल किंवा मनाने श्रीमंत व्हायचे असेल तर त्यासाठी पैसा बाधक आहे. त्यामुळे नकळत पैश्यापासून आपण लांब जात राहतो. याच मुळे ३-४ महिने, कधी कधी वर्षभर मेहणतीने पिकवलेला शेत माल हा दुसऱ्याच्या ताब्यात देतो. म्हणजे काय, “जेव्हा पैसा तुमच्या पैसा खिशात यायची वेळ झालेली असते तेव्हा आपण दुसऱ्यावर अवलंबून राहतो.” पण तुम्ही जे काही करत आहात याला, तुमचा काहीच दोष नाही. कारण अनेक वर्ष तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींनी असेच सांगताना ऐकले आहे. आपले काम शेती करणे. एवढे करून आपण विक्री कशी करणार. हेच तुमच्या मनावर घट्ट रुतून राज्य करत आहे. इथे दोन गोष्टी आहेत. मनावर रुतून राज्य करणाऱ्या भावना व खरच गरज असणारा तर्क विचार. या मध्ये जर कोणाची निवड करायची झाली तर भावनेचाच नेहमी विजय होतो. मग याच भावनांचे भांडवल करून कोणीतरी तुमच्या वर राज्य करतो. तुमच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची पूर्ण काळजी घेतली जाते. आणि मग माझ्या शेतकरी बांधावा प्रती सहानुभूती दाखवली जाते.

मित्रांनो एकदाका तुम्ही “सहानुभूतीच्या” चक्रव्युहात अडकला कि नेहमी तेच आवडते आणि तुम्हाला नक्की काय पाहिजे याचा तर्क विचार कधीच करत नाही. म्हणजेच काय कि, तुम्ही जिथे आहात तिथेच योग्य आहात हे दररोज सहानुभूतीच्या माध्यमातून पटवून दिले जाते. पण दुसरे मन चांगला भाव मिळून जरा जास्त पैसे मिळाले तर किती बरे, होईल या मध्ये अडकले असते. शेवटी सहानुभूतीच बरी वाटते कारण ती सवायीची असते.

तेव्हा मित्रांनो, आत्ता पर्यंत तुमच्या लक्षात आलाच असेल कि तुमचे आर्थिक वाटोळे करणारा रावण कोण आहे? मागील लेखात सांगितल्या प्रमाणे परत इथे लिहू इच्छितो कि, “तुमच्या मनात तुमच्या सवयीच विचार ठरवतात, तुमचे विचार निर्णय घेतात. निर्णय कृती ठरवतात आणि त्या नुसार तुम्हाला त्याचे फळ मिळते.” इतकी वर्ष जे काही तुम्ही ऐकत आला आहात त्या वरूनच तुमचा आर्थिक आराखडा तयार झालेला आहे. तुमचे आर्थिक बाबतीत जे काही यश अपयश आहे त्याला तुम्हीच जबाबदार आहात. जर पैश्याच्या विवंचनेतून बाहेर पडायचे असेल, किंवा आर्थिक यश मिळायचे असेल तर “ही जबाबदारी तुमची तुम्हाला स्वीकारली पाहिजे”. एकदा तुम्ही ही जबाबदारी स्वच्छेने स्वीकारली कि आयुष्य आपोआप बदलायला लागेल. आयुष्यात चांगल्या गोष्टी घडू लागतील. ही जबाबदारी जर सक्षम पणे पेलायची असेल तर खालील गोष्टी करा:-

  1. वरील नमूद पैश्याबद्द्लच्या नकारात्मक गोष्टी लिहून काढा.
  2. ही विचार पद्धती कोठून तयार झाली याचा विचार करा.
  3. जर ती विचार पद्धती तुमच्या आर्थिक प्रगतीला मारक असेल तर त्या पासून बाजूला व्हा.

वरील गोष्टी करत असताना तुम्ही आर्थिक बाबींमध्ये कुठे आहात आणि तुम्हाला कोठे जायचे आहे.  (तुमचे आर्थिक यश म्हणजे काय?) याचा विचार करा. “कोठे जायचे आहे हे जो पर्यंत ठरवणार नाही, तो पर्यंत कस जायचे हे कसे समजेल.?

आज इथेच थांबू. पुढील भागात पैश्यांच्या अवती-भोवती तुम्ही जे काही पाहत आला आहात व त्यांचा तुमच्या आयुष्यवर कसा परिणाम होतो हे पुढील भागात पाहू.