सकारात्मक व्हा…!!!
“पैश्याच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी” हा सुविचार आपल्या मनावर लहानपणापासून कोरला गेलेला असतो. पण जसं मोठा होत गेलो तसा मी वेगळा विचार करू लागलो. हे वाक्य मला अधुरं वाटायला लागलं. पैश्यांचा विचार, घरदार, समाज, पगार, जगण्यासाठी धावणं, जिंकण, कोलमडणे, परत उभं राहणं….. हे सर्व अनुभवताना, इतरांचे बघताना हे वाक्य माझ्या परीने पूर्ण करायचा प्रयत्न केला. त्या वाक्याला जोड दिली. पैश्याच्या श्रीमंती पेक्षा मनाची श्रीमंती मोठी आहेच, पण फक्त मनाचा मोठेपणा पुरेसा नाही, तर जोडीला आर्थिक स्वाथ्य हे हवच.
आपल्या मानात ठासून भरलेले असतात जे आपल्या प्रगतीच्या आड येतात. आपलं मन आपल्याला नेहमी सुरक्षित क्षेत्रामध्ये Comfart Zone ठेवण्याचा प्रयत्न करते आणि इथेच सर्व प्रगतीचे मार्ग थांबतात. नकारात्मक विचारांमुळे आपण चांगल्या सवयींपासून नेहमी दूर राहतो. कारण माणसाची प्रगती ही नेहमी काहीही, “करण्याची सवय अथवा न करण्याची सवय” या वर अवलंबून असते. काही लोकांना पैसे खूप सहज मिळतात, तर भरपूर लोकांना पैसे मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात”. शिक्षण, बुद्धिमत्ता, कौशल्य, वेळ, त्यांच्या ओळखी, त्यांचे बळवंतर नशीब, त्यांचा व्यवसाय, त्यांची गुंतवणूक या गोष्टीमुळे असा हा फरक असावा का?
या प्रश्नाचे आश्चर्यकारक उत्तर आहे, असे काहीही नाही. एखादी व्यक्ती त्याच्या जीवनात पैशाने एकदम यशस्वी होते याचे एकमेव कारण म्हणजे, “पैसा व यश यासाठी लागणारी त्याची आर्थिक संकल्पना (Financial Blue print)”. ही आर्थिक संकल्पना प्रत्येक व्यक्तीच्या आंतरीक मनात ठासून भरलेली असते प्रत्येक व्यक्तीसाठी ती वेगवेगळी असते. म्हणून एका व्यक्तीचे यश हे नेहमी दुसऱ्या व्यक्तीपासून पूर्ण वेगळे असते. आपण आपल्या आर्थिक संकल्पनेवर काम केल्याशिवाय पैश्याबाबत यश मिळू शकणार नाही.
आर्थिक संकल्पना ही प्रत्येक व्यक्तिच्या पैश्याबद्दल असणारे विचार, भावना व त्यावर करत असलेली क्रिया यावर अवलंबून असते. ही आर्थिक संकल्पना आपण लहान असल्यापासून आपले शिक्षक, पालक, मित्र परिवार, आपले धार्मिक गुरु, आपली संस्कृती अशा अनेक पैकी काही लोकांनी आपल्या मनावर बिंबवलेल्या गोष्टींवर आवलंबून असते. काही विचार तर इतके बिंबवलेले असतात, की आपण त्यांना सहज सोडू शकत नाही. जसे की,
- अंथरूण बघुन पाय पसरावेत.
- कष्ट केल्याशिवाय पैसा मिळत नाही.
- पैसा मिळवायला पैसेच लागतात.
- मला ही गोष्ट परवडत नाही.
- पैसे सांभाळणे ही खूप मोठी जबाबदारी आसते.
- पैसे ही सर्व वाईट गोष्टींसाठी कारणीभूत आहे.
- पैसा माझासाठी एवढा महत्वाचा नाही. म्हणजे माझा आयुष्यात मी पैशाला महत्व देत नाही .
- गुंतवणूक करणे ही फक्त पैशावाल्यांची गोष्ट आहे.
- भरपूर पैसा कमविण्यासाठी चांगले नशीब लागते.
- दुसऱ्याच्या डोक्यावर पाय देऊनच भरपूर पैसे कमावता येतात……
जरा विचार करून बघा, की आपण ज्या ज्या वेळी असा नकारात्मक विचार करतो त्या त्या वेळी या विश्वामध्ये असणारी एक अनामिक शक्ती आपल्याला म्हणते “तथास्तु !” त्यामुळे आपण कसा विचार करतो यावर बारकाईने लक्ष देण्याची आणि त्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. आपण पैशाबद्दल कसा विचार करतो व त्या नकारात्मक गोष्टी कशा बदलायच्या यासाठी एक छोटा प्रयोग स्वत: साठी करा :-
- समजणे:- पैसा व श्रीमंत माणसांबद्दल तम्ही लहानपणापासून ऐकलेली सगळी वाक्य लिहून काढा.
- जाणून घ्या:- या सर्व नकारात्मक वाक्यांमुळे आपल्या आर्थिक यशा मध्ये काय परिणाम झाला आहे?
- बाजूला करा :- या सर्व नकारात्मक गोष्टी आपण आपल्या जन्मापासून घेऊन आलेलो नाही. तेव्हा या सर्व गोष्टी आपण बाहेर फेकून देऊ शकतो.
- घोषणा करा:- स्वत:ला ठामपणे सांगा की पैशाबद्दलच्या या सगळ्या नकारात्मक गोष्टी अजिबात बरोबर नाहीत.
मला माझ्या आर्थिक यशासाठी सकारात्मक गोष्टींचा विचार करायला हवा. ही खुणगाठ पक्की बांधा. आपली आर्थिक स्वायतता, आर्थिक विकास, आर्थिक यशासाठी आपल्या स्वत:च्या आर्थिक संकल्पनेवर लक्ष्य केंद्रित करून ती अधिक सकारात्मक कशी करायची हाच नवीन वर्षाचा ठराव करून वर्षाची सुरुवात करूया.